पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यामुळेच मराठा आरक्षण मिळालं नाही हे गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांचं म्हणणं योग्यच आहे. शरद पवार हे सगळ्याचे गॉडफादर आहेत. शरद पवार हे ठाकरे सरकारचे मार्गदर्शक आहेत. मराठा आरक्षणप्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचल्यावर किती दिरंगाई झाली ते समजतं, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले. (padalkars said reservation was not obtained due to pawar is correct)
चंद्रकांत पाटील म्हणाले, “गोपीचंद पडळकरांनी काही भूमिका मांडली आहे. पवार सगळ्यांचे गॅाडफादर आहेत. तसं म्हटल्यानंतर त्यांच्यावर दोष जातो. माझी डिबेट करायची तयारी आहे. मी निकाल वाचला. त्यात पावला-पावलावर जाणवतंय की चुका आहेत. ॲार्डिनन्सचा कायदा केला नाही”.
काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर ?
“शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात जनमत नसताना घातपाताने बनलेले आघाडी सरकार बहुजनांच्या हक्काच्या आरक्षणाच्या मुळावर उठलेलं आहे. आधी मराठा समाजाचं, आता ओबीसींचं राजकीय आरक्षण आणि बहुजनांचं पदोन्नतीतील आरक्षण संपवण्याच्या ‘कटा’चा ‘सुत्रधार’ कोण? पवार घराण्याची चाकरी करणारा कुठला सरकारी वकील आरक्षण विरोधी ‘कट-कुंभा’चा ‘कोणी’ कोण ?” असे पडळकर म्हणाले होते.