नवी दिल्ली – केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यावरुन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना रुपाणी यांनी सणसणीत टोला लगावला आहे. “राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथी मधला फरक माहिती आहे का?” असा सवाल विचारला आहे.
विजय रूपाणी यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस ज्या सुधारणांची वकीली करायची आज त्यालाच काँग्रेसकडून विरोध करुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच “मी राहुल गांधींना विचारु इच्छितो, तुम्हाला कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का?” असं रूपाणी यांनी निशाणा साधला आहे.
“2019 च्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने आम्ही सत्तेत आल्यास एपीएमसी कायद्यामध्ये बदल करु आणि शेतकऱ्यांना त्यांच्या ठरलेल्या बाजारपेठांच्या बाहेर शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देऊ. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाच बदल केला आहे तर काँग्रेस याचा विरोध का करत आहे?” असं रूपाणी यांनी म्हटलं आहे.