नवी दिल्ली : मागील अनेक महिन्यापासून भारतासह संपूर्ण जग कोरोना व्हायरसवरील लसीची वाट पाहत आहे. अनेक देशांमध्ये सर्वसामान्यांसाठी कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे. भारतात देखील अनेक लसींवर काम सुरू असून, नवीन वर्षात नागरिकांना लस मिळणार असल्याचे संकेत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहेत.
जानेवारी महिन्याच्या कोणत्याही आठवड्यात नागरिकांना लस दिली जाऊ शकते, असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
जानेवारी महिन्यात देशात लोकांना कोव्हिड-19 वरील प्रभावी लस दिली जाऊ शकते. लसीची सुरक्षा आणि परिणामकारकतेला आम्ही प्राधान्य देणार आहोत. याबाबत आम्हाला कोणतीही तडजोड करायची नाही. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की, जानेवारी महिन्याच्या कोणत्याही आठवड्यात आपण भारतीय नागरिकांना पहिली कोरोना लस देण्याच्या स्थितीत येऊ शकतो, असे डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) सध्या भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि फायजर या कंपन्यांनी केलेल्या विनंती अर्जांची तपासणी करत आहे. जेणेकरुन या कंपन्यांच्या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देता येईल.