जळगाव : आपल्या पक्षावर नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर दिला आहे. मला देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खूप त्रास झाला हे मी नाव घेऊन सांगतो असे खडसे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने भाजपमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
एकनाथ खडसे यांच्यावरील “जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज खडसे फार्महाऊस येथे ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागळे यांनी पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन केले. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना एकनाथ खडसे यांनी या नेत्यांच्या उपस्थितीतच पक्षातून होत असलेल्या अन्यायाबाबत स्वपक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
खडसे म्हणाले, ”माझ्यावर अन्याय झाला आहे. हा नाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही, स्वस्थ बसणारा नाही. पक्षच्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार. मुखमंत्री तेव्हा अंजली दमानिया यांना वेळ देत भेटत होते. पण खडसें याना भेटत नव्हते. पुरावे आहेत, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला. आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. कोणावरही आरोप झाले की लगेच क्लिनचिट मिळायची. मात्र खडसे यांना निर्दोष असतांना क्लिनचिट मिळाली नाही,” असा टोलाही एकनाथ खडसे यांनी लगावला.