पुणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पण ‘सरनाईकांच्या घरावर टाकलेल्या छाप्यातून काही साध्य होणार नाही. राज्यकीय नेत्यांना अशाप्रकारे त्रास देणं ही भाजपची जुनी सवय आहे. पण असं अडचणीत आणायचा प्रयत्न केला तर महाविकास आघाडी अधिक बळकट होईल’, असं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिलं आहे.
जयंत पाटील आज मावळमध्ये होते. त्यावेळी त्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीनं टाकलेल्या छाप्यावर भाजपवर जोरदार निशाणा साधला. राज्यकीय नेत्यांना त्रास देण्याची भाजपची जुनीच सवय असल्याची टीका पाटील यांनी केली आहे. ‘महाविकास आघाडीचं सरकार पडेल, असं भाजपकडून नेहमीच बोललं जातं. त्यामुळं त्यावर नेहमी प्रतिक्रिया द्यावी, असंही आता वाटत नाही’, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.
ईडीने काल मंगळवारी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. आज प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वॉरंटाईन राहावं लागत आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
त्यामुळे सरनाईक आज ईडीसमोर चौकशीला हजर राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सरनाईक यांनी ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केली असली तरी अजून त्यावर ईडीने काही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ईडी काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Read Also :
लग्न एकासोबत लफडं दुसऱ्यासोबत मनसेची शिवसेनेवर खोचक टीका
‘वर्षभरापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला, तरीही महाविकास आघाडी सरकार आलं आणि टिकलं’
निलेश राणे म्हणतात…“ठाण्यातील शिवसेनेच्या सगळ्याच आमदार, खासदारांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले”
‘आम्ही मास्क घालण्याचं आवाहन करतो तर दुसरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करतायत’
“प्रताप सरनाईक यांच्याविरोधात दडपशाही सुरु आहे, ही झुंडशाही आहे; शिवसेना सरनाईकांच्या पाठीशी”
‘सरनाईक, वायकर हा तर मुखवटा, खरा कलाकार कलानगरमध्ये’ राणेंचा ठाकरेंवर निशाणा