पुणे : गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या शिवसेना शिंदे गटातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अखेर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिरूर लोकसभेत विद्यमान खासदार अमोल कोल्हे विरूद्ध शिवाजीराव आढळराव पाटील असा सामाना निश्चित झाला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून राष्ट्रवादीचा प्रमुख विरोधक असलेल्या आढळराव पाटलांना निवडून आणण्यासाठी आता अजितदादांच्या कार्यकर्त्यांना काम करावं लागणार आहे. तसेच कोल्हे विरूद्ध आढळराव पाटील असा जोरदार सामाना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांनी हाती घड्याळ बांधलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच शिरूर मतदारसंघातील आमदार, पदाधिकारी, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मतदारसंघातील शिवगीरी मंगल कार्यालय मंचर याठिकाणी आढळराव पाटलांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके, विलास लांडे, चेतन तुपे, तसेच इतर नेते उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर कोल्हे यांच्याविरोधात कोण उमेदवार असणार? याची मोठी चर्चा सुरू झाली होती. सुरूवातीला आढळराव पाटलांना दिलीप मोहिते पाटील यांच्यासह विलास लांडे तसेच राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी देखील विरोध केला होता. मात्र अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्यानंतर स्थानिक नेत्यांनी मावळ भूमिका घेतली.
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या महायुतीची ताकद अधिक बघायला मिळत आहे. त्याचबरोबर आढळराव पाटील यांना राजकारणाचा कोल्हे यांच्या पेक्षा अधिक अनुभव आहे. मात्र सध्या राष्ट्रवादीत पडलेली फुट अन् त्यामुळे निर्माण झालेली लोकभावना ही शरद पवार यांच्यासोबत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील लढत खुपच अटीतटीची होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.