नवी दिल्ली : 2020 हे वर्ष कोरोना व्हायरस महामारी आणि लॉकडाऊनमध्येच गेले. मात्र नवीन वर्षात या महामारीपासून सुटका होण्याची शक्यता आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली आहे. भारतात देखील लवकरच कोरोनावरील लसीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
नवीन वर्षाचे स्वागत कोरोना लसीने होण्याची शक्यता आहे. पहिल्याच दिवशी भारतीयांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता असून, याबाबतचे संकेत डीसीजीआयच्या (Drug Controller General of India) सदस्याने दिले आहेत.
नववर्षांत काही तरी आपल्या हाती पडू शकेल, इतकेच मी आपल्याला सूचित करू शकतो, असे वक्तव्य डीसीजीआयच्या डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने आज कोरोना लसीची घोषणा होणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.
भारतात परवानगीच्या प्रतिक्षेत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोव्हीशिल्ड’) आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ या लसींना हिरवा कंदील दाखवला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, 2 जानेवारीला कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभरात होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.