जळगाव: जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक चांगलीच गाजली. भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले माजी मंत्री आणि जेष्ठ नेते एकनाथ खडसे विरुद्ध माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यात मोठी लढत बघायला मिळाली. जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती.
यामध्ये एकनाथ खडसे यांनी बाजी मारत संकमोचक असणाऱ्या गिरीश महाजन यांना घरचा रास्ता दाखवला आहे. महाजनांना धड पुढेही जाता येत नव्हते आणि धड मागेही फार येत नव्हते. मुरलेल्या नाथाभाऊंपुढे गिरीश महाजनांचे राजकारण हे चक्क कच्चा लिंबू ठरल्याची चर्चा संपूर्ण जळगावात रंगली आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनल निर्मितीची प्रक्रियेस सुरुवात झाली आणि त्यातच सुरुवातीपासूनच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी आघाडी घेतली होती. काँग्रेसच्या बदलत्या भूमिकेमुळे अचानक काहीसा घोळ तयार झालाहोता . त्यातच गिरीश महाजनांनी काँग्रेसला कमी समजले होते.
काँग्रेसला कमी समजणाऱ्या गिरीश महाजनांना हे माहित नव्हते की काँग्रेसने त्यांच्याबाबत पहिलेच सुरुंग पेरून ठेवले होते. याच दरम्यान अजित पवार व त्यांच्या कुटुंबियांवर केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे पडले आणि समीकरणं बदलण्यास सुरुवात झाली. अनेक इच्छुकांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. काहींनी दूरध्वनीद्वारे त्यांच्यासोबत चर्चा केली.
बँक निवडणुकीत एकवीस जागांत भाजप, राष्ट्रवादीला प्रत्येकी सात, शिवसेनेसा पाच व काँग्रेसला दोन असे सूत्र होते. त्यानुसार भाजपने सात जागांवर उमेदवारी अर्ज भरले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र सर्व एकवीस जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काँग्रेसने सहा तर शिवसेनेने सात ते आठ जागांवर उमेदवार दिले होते.
नेहेमीच प्रचंड आत्मविश्वासाने वागणारे महाजन यांच्या हा साधा डाव लक्षातच आला नाही. त्यांचे उमेदवारी अर्ज फक्त नऊ जागांवरच होते. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीच्या एक दिवस आधी एकनाथ खडसे सुडबुद्धीने वागणाऱ्या भाजपशी युती अशक्य असल्याचे जाहीर केले. तेव्हा भाजप पुरता अडकला होता. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या राजकारणावर शेवटचा घाव बसला तो भाजपचे महत्त्वाचे अर्ज बाद झाल्याचा. विशेष म्हणजे महाजनांच्या गोटात येऊन नाथाभाऊंना ललकारणाऱ्या रक्षाताईंना अर्ज देखील भरता येत नाही, यावरून गुलाबराव पाटील यांनी त्यांची खिल्ली उडवली.