जळगाव : जळगाव महानगर पालिकेमध्ये सत्ताधारी भाजपाला पराभवाचा धक्का देत शिवसेनेनं भगवा फडकावला आहे. हा भाजपासोबतच जळगावमध्ये ज्यांचं प्रस्थ मानलं जातं, ते भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन यांचं मोठं अपयश म्हटलं जात आहे. त्याचवेळी काही महिन्यांपूर्वीच “बदल करून दाखवेन”, असा शब्द व्यासपीठावर जाहीरपणे देत भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांचा तो मोठा विजय मानला जात आहे. जळगाव महानगरपालिका निवडणुकीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ खडसे यांची चर्चा झाली होती. खडसे यांनी सांगितलं की तुम्ही शिवसेनेचा महापौरपदासाठी तुमचा उमेदवार दिला, तर मी मदत करू शकेन. त्यानुसार ठाकरे यांनी शिवसेना महापौर पदासाठी उमेदवार दिला आणि पुढे जळगाव महापालिकेवर भगवा फडकावला गेला. या पुढे विशेष म्हणजे महापौर व विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडेच गेले.
जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्ष सत्तेत असलेल्या भाजपला जोरदार धक्का देत महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेने विजय मिळवला. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपचे 27 तर एम आय एम पक्षाचे तीन नगरसेवक फोडले होते. त्यामुळे मतदानाच्या वेळी शिवसेनेला 45 तर भाजपला 30 मते मिळाली.
जळगाव महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची निवड झाली आहे. मात्र उलथापालथानंतर जळगावात एक अजब राजकीय समीकरण पाहायला मिळत आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपद पत्नीकडे, तर विरोधी पक्षनेतेपद हे पतीकडे असल्याचा योगायोग जुळून आला आहे. विशेष म्हणजे महापौर व विरोधी पक्षनेतेपद हे एकाच पक्षाकडे आहे.
जयश्री महाजन या शिवसेनेच्या महापौर झाल्या आहेत, तर त्यांचे पती सुनील महाजन विद्यमान विरोधी पक्षनेते आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असा योगायोग पाहायला मिळत आहे.
२०१८मध्ये झालेल्या निवडणुकीत ७५पैकी ५७ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली. शिवसेनेला अवघ्या १५ जागा मिळाल्या होत्या. एमआयएमच्या तीन जागा असल्याने विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेला मिळाले. शिवसेनेचे सुनील महाजन विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका पार पाडत आहेत.
बंडखोर नगरसेवकांना अद्यापही स्वतंत्र गट स्थापन करता आलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडेच राहिले आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला कोणत्याही पदाची गरज नाही. महापौर शिवसेनेचा असला तर आम्ही विरोधातच राहू, चुकीच्या कामांना महासभेत विरोध केला जाईल.- भगत बालानी, गटनेते, भाजप