मुंबई महापालिका निवडणुकीला अजूनही वर्षभराचा कालावधी आहे. परंतु त्याआधीच भाजप आणि शिवसेनेत लढाई सुरु झाली असून या निवडणुकीत मुंबई महापालिका जिंकण्याचे उद्धिष्ट भाजपने ठेवले आहे. यासाठी भाजपने मिशन मुंबई सुरु केले असून आतापासूनच निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार केल्यानंतर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सडकून टीका केली आहे.
प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका करत भाजपने कितीही प्रयत्न केला तरीही महापालिकेवर भगवा फडकणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या शिक्षकानं आणि पदवीधर निवडणुकीत जनतेने हे दाखवून दिल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले. त्याचबरोबर मुंबई महापालिकेला अजून वर्षभराचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे वर्षभराने महापालिकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने भगवा फडकण्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. सुशिक्षित जनतेने या पदवीधर निवडणुकीत भाजपचा पराभव करून हे दाखवून दिल्याची टीका देखील त्यांनी यावेळी भाजपवर केली. त्यामुळे आम्हाला काळजी नसल्याचे देखील त्यांनी म्हटले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेवर स्वबळावर झेंड फडकवणार असल्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या अतुल भातखळकर यांना भाजपने प्रभारी म्हणून जाहीर केलं आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी देखील त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत ज्यांनी आमच्याबरोबर २५ वर्ष महापालिकेत सत्तेची बोरं चाखली तोच पक्ष आमच्यासमोर शड्डू ठोकत असेल तर आम्ही आव्हान स्वीकारले असे समजा, असे म्हणत भाजपवर सडकून टीका केली होती.