कोल्हापूर: महाराष्ट्रात आता पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीनंतर कोल्हापूर जिल्हा दूधसंघ – गोकुळ Kolhapur Dudh Sangh Gokul Election च्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार महादेव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यात मोठी टक्कर होणार आहे. गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीदरम्यान फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक Shaumika Mahadik यांनी देखील निवडणुकीत आघाडी घेतली आहे. त्यांनी देखील विरोधी गटावर टीकांचे बाण सोडण्यास सुरुवात केली आहे.
दयाचे वडगाव ( ता . करवीर ) येथे झालेल्या सत्तारुढ राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचार सभा पार पाडली. या मेळाव्यात त्यांनी जोरदार भाषण केले आणि विरोधकांचा समाचार घेतला आहे. शौमिका महाडिक म्हणाल्या, “निवडणूक कोणतीही असो वृत्तपत्र उघडताच बावड्याच्या पाटलांचा महाडिकांविषयी जप चालूच असतो. गोकुळची निवडणूक अतितटीची असल्याचे त्यांचे मत चुकीचे असून निकालानंतरच त्यांना त्याची जाणीव होईल. आमच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांनी कागल तालुक्यातील महालक्ष्मी दूध संघ का बंद पडला आणि त्यांच्याकडे असणाऱ्या कोणत्या सहकारी संस्था व्यवस्थित चालविल्या हे सुद्धा सांगावे.
गोकुळ’च्या निवडणुकीत पालकमंत्री शिळ्या कढीला ऊत आणत आहेत. त्यांना स्क्रिप्ट लिहून देणाऱ्यांनी आता कन्सेप्ट बदलावी, अशी खरमरीत टीका आज जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केली. महाडिक यांचा पालकमंत्र्यांना इतका अभ्यास आहे, की त्यांना डॉक्टरेट दिली पाहिजे. महाडिक यांचा जप बंद करून त्यांनी निवडणुकीवर लक्ष द्यावे, असेही त्या म्हणाल्या की, महाडिकांनी गोकुळ’मध्ये टँकरच्या माध्यमातून डल्ला मारल्याचा आरोप केला जातो. पण, महाडिक उद्योग समूह अनेक वर्षे कार्यरत असून त्याच्या तीन टक्केही देखील उत्पन्न गोकुळ मधून मिळत नाही. प्रत्येक निवडणुकीत महाडिकांना टार्गेट करून बोलणे बंद करावे. या असल्या प्रचाराला कुणीच ठरावधारक बळी पडणार नाहीत. राजर्षी शाहू आघाडीला विजयी करूनच विरोधकांचा डाव ठरावधारक हाणून पाडतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला .