कराड: पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते पाटील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. . कोरोना महामारीच्या संकटकाळात निवडणूक प्रक्रिया पार पडत असल्याने अनेक सामाजिक संघटनांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी प्रयत्न केले होते.मात्र आता निवडणूक अंतिम टप्प्यात आल्याने सत्ताधारी गट आणि विरोधी गटातील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज गर्दी केल्याचे दिसून आले आहे. संस्थापक पॅनलचे अविनाश मोहिते, रयत क्रांती पॅनलचे डॉ. इंद्रजित पाटील आणि सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनल यांच्यात कृष्णा कारखान्यासाठी मुख्यत्वे लढत होणार आहे.
संस्थापक पॅनलचे अध्यक्ष आणि कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी सर्वात पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरत आपले इरादे स्पष्ट केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दोन दिवसांपूर्वी सातारा दौरा झाला आणि त्यात अविनाश मोहितेंना रसद पुरणार असल्याचे अजित दादा यांनी भेटीत सांगितले. अविनाश मोहिते यांनी काही भाजपधार्जिण समर्थकांना उमेदवारी दिल्याने स्थानिक राष्ट्रवादीचे समर्थक नाराज झाले आहेत. राष्ट्रवादीच्या नाराज वाळवा गटातील समर्थकांनी आता बंडखोरीचा इशारा दिला आहे आणि तसे झाले तर अविनाश मोहितेंना निवडणुकीत मोठा फटका बसणार हे नक्की आहे.
वाळव्यातील इच्छुक उमेदवार युवराज पाटील, केदार शिंदे आणि इस्लामपूरमधील उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली तरच पॅनलमध्ये राहण्याचा निर्णय होणार असा इशारा राष्ट्रवादी समर्थकांनी दिला आहे. या सर्व नाराज गटातील राष्ट्रवादी समर्थकांनी थेट सत्ताधारी गटाचे डॉ. अतुल भोसले यांची तांबवे येथील रिसॉर्टवर एक गुप्त बैठक देखील घेतली आहे. त्यातच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे चुलत जावई संभाजी पाटील यांनी सत्ताधारी पॅनलकडून अर्ज भरल्याने आता गुंतागुंत वाढली आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी समर्थकांनी बंडखोरी केल्यास आणि जयंत पाटील यांनी छुपा पाठिंबा सत्ताधारी गटास पाठींबा दिला तर सत्तेचे पारडे जयवंतराव भोसले पॅनलच्या पदरात पडणार आहे.