मुंबई : पुण्यातल्या, जागतिक स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या सिरम इस्न्टिट्यूटचे सर्वेसर्वा आदर पूनावाला यांना, सातत्याने मिळत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. वकील दत्ता माने यांनी ही याचिका केली असून, त्यांनी आदर पूनावाला यांना लस पुरवठ्यावरुन धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील केली आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील सीरमचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी १६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून पुनावाला यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने तातडीने वाय सुरक्षा व्यवस्था देण्याची घोषणा केली. मात्र, आदर पूनावाला यांनी मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर देश सोडल्याने या घटनेला नवे वळण मिळाले.
तसेच, याबाबत, “भारतातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांपैकी काही जणांकडून धमक्या येत आहेत. यात काही राज्यांचे मुख्यमंत्री, काही उद्योग समुहांच्या प्रमुखांचा समावेश आहे. हे सर्व सीरमच्या एस्ट्रा झेनेका म्हणजेच कोविशिल्ड लसीचा तातडीने पुरवठा मागत आहेत, अशी माहिती जगप्रसिद्ध टाईम्स मॅगेझीनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले.
यावर, जर लसनिर्मिती करणाऱ्यांना असुरक्षित वाटत असेल तर याचा परिणाम लसनिर्मितीवर होऊ शकतो असा दावा दत्ता माने यांनी याचिकेत केला आहे. “जर अदर पूनावाला जीवाला धोका असण्याच्या भीतीपोटी भारताबाहेर असतील तर हे वादळात कॅप्टनविना असणाऱ्या जहाजासारखं आहे,” असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे, तसेच सीरमच्या संपत्तीचं रक्षण केलं पाहिजे अशी मागणीसुद्धा या याचिकेत करण्यात आली आहे.
दरम्यान, दत्ता माने यांनी याचिकेत आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची आकडेवारी दिली आहे. तसंच आपण पुणे पोलीस आयुक्त आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे याप्रकरणी तक्रार केली असल्याचा दावा केला आहे. तसंच महाराष्ट्र सरकारने अदर पूनावाला यांच्याकडे तक्रार करण्यासाठी विनंती केली असल्याचंही म्हटलं आहे.