पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढण्यासाठी सध्याची वेळ योग्य नाही. त्यामुळे मराठा समाजातील जाणकार, विद्वान आणि वकिलांशी चर्चा करूनच मी माझी पुढची भूमिका ठरवेन. माझी भूमिका ही सकारात्मक असेल, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कालच संभाजीराजे यांनी ट्विट करून आपण लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते.
आरक्षणासाठी आता मोर्चे काढण्याची, उद्रेक काढण्याची वेळ नाही. सध्या कोरोनाचं संकट रोखण्याची गरज आहे. आपण जगलो तर आरक्षणाचा लढा लढू शकतो. मराठा समाजात नाराजी, अस्वस्थता आहे. त्यावर मी लवकरच बोलणार आहे. आरक्षणासाठी नेत्यांना भेटायची गरज नाही. मराठा आरक्षण अभ्यासक, गायकवाड न्यायाधीश यांची भेट घेणार असल्याचंही संभाजीराजेंनी सांगितलं आहे.
संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाबाबत लवकरच भूमिका जाहीर करू असं ट्विट केलं होतं. त्याबाबत संभाजीराजे म्हणाले की,”काल ट्विट यासाठी केलं की मराठा समाजात संभ्रम अवस्था आहे. कोर्टाचा निकाल आल्यावर राजकीय वातावरण गरम झालं आहे. थोड्याच दिवसांतच माझी आणि समाजाची भूमिका जाहीर करणार आहे. त्याआधी समाजाशी आणि तज्ज्ञांची चर्चा करून भूमिका मांडणार आहे. ”आरक्षणावर सगळं सविस्तर सांगतो. माझी भूमिका म्हणजेच शाहू महाराजांची भूमिका आहे. प्रत्येक राजकीय पक्षांकडून वेगवेगळी भूमिका घेण्यात आली आहे. त्यांची आणि माझी भूमिका वेगळी आहे. माझी भूमिका वैयक्तिक नसणार आहे. यावर लवकरच भाष्य करू”, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.