पुणे: राज्यात झालेल्या पक्षफुटी प्रकरणानंतर आता राजकीय गणितं बदलली आहेत. एकेकाळी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय सामना होत असतांना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर पिंपरी चिंचवडमधीतही राजकीय समीकरण बदलली आहेत. याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांना २०२४ चा विधानसभा निवडणूक पेपर अवघड जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरूय.
अजित पवारांना आपल्या बंडात साथ दिली खरी, परंतु शहरातील कार्यक्रमातून अजित पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले अण्णा बनसोडे यांना डावलण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. यातच मध्यंतरी अण्णा बनसोडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्याही बातम्या समोर येत होत्या. त्यामुळे सध्या पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे एकमेव आमदार असलेले बनसोडे आगामी निवडणुकीत काय भूमिका घेणार ? तसेच त्यांना २०२४ साठी | विधानसभेसाठी तिकीट दिले जाणार का ? असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अण्णा बनसोडे यांचा शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांनी पराभव केला. तेच चाबुकस्वार आता शिवसेना ठाकरे गटात असून पुढील उमेदवार असू शकतात. यातच आता स्थानिक पदाधिकाऱ्यांचा रोष, भाजपने लावलेली ताकद आणि ठाकरे गटाचे चाबुकस्वार या सर्वांचा सामना एकाच वेळी बनसोडेना करावा लागणार आहे. या सर्व गोष्टींमुळे बनसोडेना २०२४ चा विधानसभा निवडणूक पेपर अवघड असल्याचं बोललं जात आहे.