सोलापूर: उजनी धरणाच्या पाण्यावरून मागील काही दिवसांत सोलापुरात चांगलाच राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना देण्याच्या विरोधात सोलापुरातील महाविकास आघाडीतील सर्व आमदार आणि नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकवटले होते. काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय मामा शिंदे यांचा देखील त्यात समावेश होता. उजनीच्या पाणी प्रश्नी एकत्र येणारे हे दोन आमदार आता सोलापुर शहरातील रस्त्यांच्या कामांवरून एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत.
सोलापूरमधील स्थानिक व्यापारी व लोकप्रतिनिधींशी सल्लामसलत करून तात्काळ निर्बंधातुन सूट देऊन सोलापूर शहरातील व्यापार, उद्योग, विडी, यंत्रमाग कारखाने, सुरू करण्यात यावे अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे व सोमपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे मागणी केली आहे.
शहरातील प्रश्नांच्या माध्यमातून आमदार संजय शिंदे यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्व्रर यात्रा, पदवीधर व शिक्षक आमदारकीची निवडणूक आणि आता शहरातील लॉकडाउन चे निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात त्यांनी विशेष लक्ष घातले आहे. दुसऱ्या बाजूला आमदार संजय शिंदेंची शहरात होणारी ढवळाढवळ लक्षात घेत आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात शहरातील राजकारणामुळे संघर्ष निर्माण होतो की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेतील राजकारणात काँग्रेस पक्ष हाच राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा भाऊ आहे हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेसच्या आमदार आणि नेत्या प्रणिती शिंदे प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे. शहरातील व्यापाऱ्यांच्या हितासाठी आमदार संजय शिंदे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला होता तर आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी संवाद साधला होता. त्यामुळे येणाऱ्या काळात व्यापाऱ्यांच्या बाबतीत येणाऱ्या निर्णयावरून तो निर्णय कोणामुळे झाला आणि हे श्रेय कुणाचे यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.