शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आला आहे. या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी ठाकरे सरकार, भारत-चीन सीमावाद, राहुल गांधी, नरेंद्र मोदी अशा विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. राऊत यांना मोदींवर प्रश्न विचारल्यावर शरद पवारांना हसू आले.
राऊत यांनी विचारले की, मोदी तुम्हाला गुरु मानतात, त्यांना तुम्ही अर्थव्यवस्था सावरण्यासंदर्भात काही सल्ला द्याल ?, यावर हसहसत उत्तर देताना पवार म्हणाले की, मोदी तुम्हाला गुरु मानतात असे म्हणून तुम्ही मलाही अडचणीत आणू नका आणि मोदींनाही अडचणीत आणू नका. राजकारणात कुणीही कुणाचा गुरु नसतो. सोयीची भूमिका आम्ही लोक एकमेकांच्या संदर्भात मांडत असतो. अलिकडे त्यांची माझी काही भेट झालेली नाही.
वाईट स्थितीमध्ये असलेल्या अर्थव्यवस्थेवर पवार म्हणाले की, कोरोनाचे संकट आल्यानंतर मोदींनी ज्या सर्वपक्षीय बैठका घेतल्या त्यामध्ये त्यांच्याशी जो संवाद झाला त्यापलिकडे त्यांचा माझा संवाद नाही. मला असे वाटते की अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी मोदींनी काही जाणकारांची मदत घेण्याची आवश्यकता होती. आरबीआयचे एक गव्हर्नर होते जे सोडून गेले, नेमके काय झालं ते ठाऊक नाही. अशी माणसे किंवा डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखी माणसं यांच्याशी मोदींनी चर्चा करायला हवी. मात्र तसे करताना ते दिसत नाहीत. देशात अनेक जाणकार आहेत जे चांगला सल्ला देऊ शकतात.