मुंबई – मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिलीय. किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केलीय. 22 डिसेंबरला मुंबई महापालिका कार्यालयात असताना धमकी दिली गेली होती.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण जामनगरमधून बोलत असल्याचं सांगितलं. आपण लगेचच वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यालयात फोन करुन तक्रार दिल्याची माहिती पेडणेकरांनी दिली. सुरक्षा वाढवण्या संदर्भात मला विचारलं होतं, पण महापालिकेची सुरक्षा असल्याचं किशोरी पेडणेकरांनी सांगितलं.
“फोन करणारा मी जामनगरमधून बोलतोय, असं सतत बोलत होता. तीन-चार फोन आले, म्हणून मी उचलले. मी फोन स्पीकरवर ठेवला होता. फोन उचलल्यावर त्याने घाणेरड्या भाषेत बोलायला सुरुवात केली. अश्लील शिव्या दिल्या. जर पोलिसांना सांगितलंत, तर मारुन टाकेन, असं म्हणाला होता. मी लगेच विश्वास नांगरे पाटील यांच्या ऑफिसला फोन केला. त्यांनी दखल घेऊन लगेच पत्राद्वारे सगळी माहिती घेतली” अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.
“मी त्याच रात्री पाच दिवसांसाठी बाहेर गेले होते आणि 25 डिसेंबरला मुंबईत आले. माझं, माझ्या पीएचं आणि तिथे उपस्थित असलेल्या विशाखा राऊत यांचं स्टेटमेंट घेतलं असून गुन्हा नोंदवला आहे. फोन करणाऱ्याने खंडणी वगैरे मागितलेली नाही. माझा नंबर कुठेही मिळू शकतो, पण माझ्याबरोबर असलेल्या पीएचा नंबर सगळीकडे असू शकत नाही” असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.