अहमदनगर : राज्यात कोरोनारुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये वाकयुद्ध रंगल्याचे देखील पाहायला मिळाले होते. यातच आता भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा अहमदनगरला आणल्या चर्चा सुरू झाली आहे.
सुजय विखे पाटील यांनी स्वतः रेमडेसिव्हिरचा साठा नगरला आणल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसने यावर संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी हा दावा संशयास्पद असून, रेमडेसिव्हिर कोणाला वाटले ते स्पष्ट करावे, असे म्हटले आहे.
स्वत: सुजय विखे यांनीच व्हिडिओद्वारे रेमडेसिव्हिरची माहिती दिली आहे. जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा तुटवडा जाणवत होता. सगळेच हतबल झाले होते. लोकप्रतिनिधी म्हणून आपण हे पाहू शकत नव्हतो. त्यामुळे पक्ष बाजूला ठेवून आपल्या लोकांसाठी काही करावे या उद्देशाने खासगी विमान करून आपण दिल्लीतून ही इंजेक्शन्स आणली आहेत. यात पक्षाचा संबंध नाही, असे ते म्हणाले होते.
एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्स मध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिव्हीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी.
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) April 25, 2021
यावर आता रुपाली चाकणकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. रुपाली चाकणकर म्हणाल्या की, खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून 10 हजार इंजेक्शन आणल्याचा केला गेलेला दावा हे संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ ही नागरिकांची चेष्टा आहे.
एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्स मध्ये काय होते हे स्पष्ट करावे आणि जर रेमडिसिव्हीर असतील तर ते कुणाला वाटले अथवा सामान्य जनतेला ते कुठे मिळतील याची माहिती द्यावी, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.