पुण्यातील खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड पोलिसांकडे रविवारी (9 ऑगस्ट) एक तक्रार दिली. खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या पतीपासून जीवाला धोका असल्याचं तक्रारीत नमूद आहे.पुण्यातील खेड तहसीलदारांची बदली होत नसल्याने सत्ताधारी आमदार दिलीप मोहिते हे चांगलेच हतबल झाले आहेत.
पालकमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे त्यांच्या बदलीची मागणी केली आणि विधानसभेत लक्षवेधी सूचना देऊनही आमदार मोहितेंना दाद मिळाली नाही. पण आता त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये तहसीलदार सुचित्रा आमलेंच्या पतीकडून जीवाला धोका असल्याची तक्रार दिली आहे.
तालुक्यातील तलाठी, सर्कल आणि शासकीय कर्मचारी नागरिकांना सहकार्य करत नसल्याचं, शिवाय अवास्तव मागणी करत असल्याचं, महसूल अधिकाऱ्यांवर तहसीलदारांचे नियंत्रण नसल्याचं, अवैध कामांना तहसीलदारांनी संरक्षण दिल्याचं, त्यांच्या कामचुकारपणामुळे तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप आमदारांनी तक्रारीत केला आहे.
तहसीलदार आणि त्यांचे पती बाळासाहेब आमले यामुळे माझ्यावर चिडून आहेत. ते विरोधकांना हाताशी धरुन माझी बदनामी करत आहेत. तसेच ‘माझ्या बायकोची बदली केली, तर बघून घेईन’ अशी धमकी ही दिल्याचं तक्रारीत नमूद आहे. बाळासाहेब आमले यांचे गुंडांशी संबंध असल्याने, ते नवीन तहसीलदार येण्यापूर्वीच तालुक्यात दहशत माजवत आहेत. ते माझा घात-पात करण्याची दाट शक्यता आहे. माझ्या जीवाला काही धोका झाल्यास, त्यास बाळासाहेब आमले हेच जबाबदार असतील असं आमदार मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.