मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी आग्र्यातील निर्माणाधीन मुघल संग्रहालयाचे नाव बदलण्याची घोषणा केली. हे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असं ते म्हणाले. हे संग्रहालय ताजमहालच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ उभारले जात आहे. योगींच्या या निर्णयाचे महाराष्ट्रातून स्वागत होताना पहायला मिळत आहे. तर यावरून आता नितेश राणे यांनी राज्यातील सत्ताधाऱ्याना टोला लगावला आहे.
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत आहेत आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी महाराजांच्या वंशजाकडे पुरावे मागतात. दुर्देव ते आमचे !,” असं म्हणत नितेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
नितेश राणे यांचा रोख हा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडे असल्याचे दिसून येते कारण काही दिवसांपूर्वी राऊत यांनी थेट उदयनराजेंवर टीका करत ते जर वंशज असतील तर त्यांनी पुरावे द्यावेत असे विधान एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाच्या मुलाखतीत केले होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी शिवाजी महाराजांचा जय जयकार करत आहेत..
आणि
महाराष्ट्रातील सत्ताधारी महाराजांच्या वंशजाकडे पुरावे मागतात..
दुर्देव्य ते आमचे !— nitesh rane (@NiteshNRane) September 15, 2020