मुंबई : देशात हाताबाहेर गेलेल्या महामारीच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, सध्याची स्थिती हाताळण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नेतृत्व द्यावे, अशी मागणी भाजप ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
दरम्यान, त्यांच्या या मागणीला आता राज्य भाजपमधूनही पाठिंबा मिळत असून, भाजपच्या राज्य कार्यकारणी सदस्या आणि ज्येष्ठ महिला नेत्या नीता केळकर यांनीही, ट्विटरच्या माध्यमातून सकारात्मक प्रतिक्रिया देत, “महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्यसेवेशी निगडीत सर्व सूत्रे ही नितीन गडकरींच्या कडे द्यावीत, या सुब्रमण्यम स्वामींच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. आपण आहात का? कमेंट करा, शेअर करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
कोवीड चा सामना करण्यासाठी आरोग्यसेवेशी निगडीत सर्व सूत्रे ही नितीनजी गडकरींच्या कडे द्यावी यासुब्रमण्यम स्वामींच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. आपण आहात का? कमेंट करा शेअर करा. pic.twitter.com/JTNR1j9DyC
— Neeta Kelkar (@NeetaKelkar1) May 6, 2021
यावेळी नीता केळकर यांनी पक्षाच्या ट्विटर अकाउंटसोबतच सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, प्रवक्ते केशव उपाध्ये, अतुल भातखळकर यांच्यासह राज्यातील अनेक भाजप नेत्यांनाही टॅग केले आहे.
दुसरीकडे याबाबत केळकर यांच्याशी संपर्क साधला असता, ‘‘देशावर मोठी आपत्ती आली आहे. या काळात गडकरींसारख्या अनुभवी नेतृत्वाचा पक्षाने पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. त्यांचे प्रशासकीय कौशल्य वादातीत आहे. ही परिस्थिती ते सक्षमपणे हाताळू शकतात,” असे सांगितले.