राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली आहे. आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित झाला. पाकिस्तान नाही तर चीन आपला मोठा शत्रू असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानपेक्षा चीन हा भारताचा मोठा शत्रू आहे, हे माझं मागील अनेक वर्षांपासूनचं मत आहे. लांब पल्ल्याच्या दृष्टीने विचार केल्यास आपल्या हितासंदर्भात खरं संकट निर्माण करण्याची ताकद, दृष्टी आणि कार्यक्रम फक्त चीनचा आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
पवार म्हणाले की, चीन प्रश्नाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन वेगळा कारण सामान्यपणे आपला विरोधक कोण किंवा शत्रू कोण याचा विचार करतो तेव्हा भरतीय मनात पहिल्यांदा पाकिस्तान येतो. मागील अनेक वर्षांपासून माझं मत आहे की पाकिस्तानपासून आपल्याला खरी चिंता नाही. पाकिस्तान आपल्या विचाराचा नाही, तो आपल्या हिताच्याविरोधात पावलं टाकतो हेही खरं आहे. मात्र लांब पल्ल्याच्या दृष्टीने विचार केल्यास आपल्या हितासंदर्भात खरं संकट निर्माण करण्याची ताकद, दृष्टी आणि कार्यक्रम फक्त चीनचा आहे. चीन हे आपल्या देशासमोरील मोठं संकट आहे, असं पवार म्हणाले.
पवार म्हणाले की, चीन हे संकट असल्याने चीनपासून आपल्या देशाला होणारा उपद्रव हा साधासुधा नाही. पाकिस्तानची लष्करी शक्ती आणि चीनची लष्करी शक्ती यात जमीन आस्मानाचा फरक आहे.
दरम्यान, सामनाचे संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत 11, 12 आणि 13 जुलैला प्रसारित होत आहे. या मुलाखतीत लॉकडाऊन, कोरोना, चीनचे संकट, ढासळलेली अर्थव्यवस्था अशा सर्वच प्रश्नांवर शरद पवार यांनी संवाद साधला.