पुणे : महाराष्ट्रात 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले असले तरी, लसींअभावी हा वेग कमी आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी असलेल्या लसीकरण केंद्रात वाढ करण्यात आली असून, ही संख्या 2 वरून 5 करण्यात आली आहे. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी असलेले लसीकरण केंद्र वाढवण्यात आले असून ही संख्या दोनवरुन पाचवर नेण्यात आली आहे. त मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटल आणि येरवडा येथील राजीव गांधी हॉस्पिटल येथे कोविशिल्ड, तर कोथरुड येथील जयाबाई सुतार दवाखाना, हडपसर येथील अण्णासाहेब मगर, धायरी येथील मुरलीधर लायगुडे रुग्णालय येथे कोवॅक्सिन उपलब्ध असणार आहे.
या केंद्रांवर केवळ नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस दिली जाणार आहे. 18 ते 44 वयोगटासाठी आपल्याकडे 10 हजार डोस उपलब्ध असल्याची माहिती महापौरांनी दिली.
तसेच, 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बुधवारपासून करण्यात आले आहे. 45 वर्षांवरील नागरिकांसाठी तूर्त दुसऱ्या डोसला प्राधान्य देत आहोत. यासाठी कोविशिल्डसाठीचे 97 केंद्र तर कोवॅक्सिनसाठीचे 18 केंद्र उपलब्ध केले आहेत. ही सर्व केंद्र महापालिकेची असून केवळ दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यातही कोविशिल्ड लशीचा पहिला डोस 20 मार्चपूर्वी आणि कोवॅक्सीन लशीचा पहिला डोस 5 एप्रिलपूर्वी घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या लशीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. 45 वर्षांवरील नागरीकांसाठी आपल्याकडे 23000 डोस उपलब्ध असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.