पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदासाठी माजी महापौर प्रशांत जगताप यांची नियुक्ती केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांनी प्रशांत जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. प्रशांत जगताप यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जगताप यांना हे नियुक्ती पत्र देण्यात आले. (Now Mission Pune Municipal Corporation, Pawar has given a big responsibility to Prashant Jagtap)
आगामी काळात होणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रशांत जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत मोठी जबाबदारी सोपविली आहे. प्रशांत जगताप यांनी या आधी महापौर, पीएमपीएल संचालक अशी अनेक पदे भूषविली. २०१६ ते २०१७ या कालावधी दरम्यान त्यांनी पुण्याच्या महापौरपदाचा कार्यभार सांभाळला होता.
तसेच सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या जवळचे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. प्रशांत जगताप यांनी महापौरपदावर असताना अतिशय कार्यक्षमपणे आणि सक्षमपणे काम केले आहे तसेच त्यांचा अनुभव पक्ष बळकटीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.