राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला असल्याने पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालये देखील अद्याप सुरू झालेली नाहीत. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक सत्रात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी जात पडताळणी प्रमाणपतत्रे वितरित करण्यासाठी अशी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी नोंदणी केल्यानंतर दिलेल्या मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. लॉकडाऊन काळात प्रमाणपत्र मिळविणे विद्यार्थ्यांना गैरसोयीचे होत असल्याने विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा मोठा पेच निर्माण झालेला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता समितीने तातडीने जात पडताळणी प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावेत. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. तसेच जातपडताळणी प्रमाणपत्रांबाबत ज्यांच्या तक्रारी आहेत, त्या प्रकरणांची खात्री करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशा सूचना श्री. पटोले यांनी यावेळी दिल्या.
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील विद्यार्थ्यांनाही जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात हे लक्षात घेऊन मराठा समाजासह अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती अशा सर्व घटकांतील सर्व विद्यार्थ्यांना सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे.