पंढरपूर : कोरोना व्हायरस महामारीच्या संकटात देखील चर्चेत आलेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संपूर्ण मतदारसंघ उमेदावाराच्या प्रचारार्थ पिंजून काढला. एकूण 19 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत.
मुख्य लढत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके आणि भाजपचे समाधान अवताडे यांच्यातच आहे. ही पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली असून, या निमित्ताने महाविकास आघाडीला धक्का देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
आरोप-प्रत्यारोप, पावसाच्या सभांमुळे ही पोटनिवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. भाजप नेत्यांकडून सरकार पडणार असल्याचा दावा केला गेला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. जयंत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्या पावसातील सभा देखील चर्चेचा विषय ठरल्या.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच काल ईव्हीएम मशिनसह इतर आवश्यक सर्व साहित्य मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे .
पंढरपूर मतदारसंघातील 3 लाख 40 हजार 889 मतदार शनिवारी उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद करतील. दरम्यान, करोनाचे संकट लक्षात घेऊन आज, शनिवारी पंढरपूर मतदारसंघातील 524 मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत मतदान होईल. या पोटनिवडणुकीची मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे.