मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे तिघे ‘चला हवा येवू द्या’च्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी तिघांनीही अनेक मजेशीर किस्से, आवडी-निवडी सांगितल्या. सोबतच ऊसतोड कामगारांसाठी एकत्र येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
कार्यक्रमात अभिनेता सागर कारंडे यांनी ऊस तोडणी कामगारांच्या अडचणी मांडणारं एक भावनिक पत्र कार्यक्रमात वाचून दाखवलं. सागर कारंडे यांच्या या पत्रानंतर मंचावर उपस्थित तिनही नेत्यांनी अत्यंत मार्मिक प्रतिक्रिया दिल्या.
यावेळी बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांनी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी आपण रोहित पवार आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली देखील काम करण्यास तयार असल्याचे म्हटले.
विखे पाटील म्हणाले की, ऊसतोड कामगारांच्या हितासाठी सगळ्यांनी मिळून काही तरी करायला हवं. माझ्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या शिक्षण संस्था आहेत. आम्ही जर सर्व एकत्र आलो तर ऊसतोड कामगारांसाठी चांगलं काम करता येईल. सर्वांनी मिळून राजकीय पक्ष बाजूला ठेवून मनापासून हे काम करायला हवं. यासाठी पंकजा मुंडे किंवा रोहित पवार यांनी नेतृत्व केलं तर आम्ही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहोत.