भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी अखेर सदस्यपदाचा राजीनामा दिला असून आता ते राष्ट्रवादी प्रवेश करणार हे नक्की झाले आहे. मुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी नाराज पंकजा मुंडेंना देखील शिवसेनेत येण्याचा सल्ला दिला आहे.
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने भाजपला उतरती कळा लागली आहे. नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयानंतर पंकजा मुंडेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, असं शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले
“मागच्या 5 वर्षांमध्ये भाजपने जी काही भरती आली होती, ती आता ओसरायला लागलीये. नाथाभाऊंसारखा ज्येष्ठ नेता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय हा भाजपला मोठा धक्का आहे. भाजपचे आणखीही बरेचसे नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. ते देखील येत्या काळात त्यांच्या बुद्धीप्रमाणे निर्णय घेतील”, असा दावा खोतकर यांनी केला.
“शिवसेनेची दारं सगळ्यांसाठी उघडी आहेत. पंकजा ताईच काय राज्यातला कुणीही नेता ज्याला सर्वसामान्यांसाठी, गोरगरिबांसाठी काम करायचंय, अशा नेत्यांना शिवसेनेची दारं उघडी आहेत” असेही अर्जुन खोतकर म्हणाले.