लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यानं मोठी मदत केली होती ए नवेळी ‘देवदूत’ बनून आलेल्या सोनू सूदच्या कामाची सर्वत्र प्रशंसाही झाली होती. एवढंच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोनूच्या कामाचं कौतुक केलं होतं. आता मात्र राज ठाकरे यांनीच सोनू सूद याच्या आर्थिक क्षमतेबाबत शंका उपस्थित केली आहे. सोनू सूदला कोणाचं आर्थिक पाठबळ आहे, ते भविष्यात कळेलच, असंही राज ठाकरे यांनी म्हटले.
एका वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यानं लॉकडाऊन काळात स्थलांतरित मजुरांना मदत केली. त्याच्या कामाची प्रशंसा झाली, तितकीच त्याच्यावर टीका देखील झाली. मात्र, त्यानं आपलं काम सुरूच ठेवलं आताही सोनू गणेशभक्तांसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी गाड्यांची व्यवस्था करत आहे. याबद्दल राज ठाकरे यांना प्रश्न विचारलं असता त्यांनी याबाबत परखड मत मांडले
सोनू सूद जे काम करतोय ते त्याचं एकट्याचं डोकं आहे, असं मला वाटत नाही. त्याला कोणीतरी आर्थिक मदत करत असावं. तो काही काही एवढा मोठा कलाकार नाही किंवा श्रीमंत नाही. तो चांगला अभिनेता असेलही, पण त्याची आर्थिक बाजू इतकी भक्कम नाही. तरीही तो मदत करतोय. त्याची आर्थिक स्थिती काय आहे? त्यामागे कोण आहे?, हे एकदा तपासलं पाहिजे,’ असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
सोनू सूद चांगलं काम करतोय त्याबाबत दुमत नाही परंतु इच्छा सगळ्यांची असते तरीही आर्थिक परिस्थितीमुळे ते करता येत नाही. सोनूला आर्थिक पाठबळ कुणाचं हे पुढे जाऊन कळेल, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.