मुंबई : तब्बल 8 तास चाललेला मध्यरात्रीचा हायव्होल्टेज ड्रामा, आक्षेपांमध्ये अडकलेली मतं आणि महाविकास आघाडीने वाढवलेली धाकधाक अशा वातावरणात साखर झोपेत म्हणजे पहाटे पावणे चारच्या सुमारास राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मात्र विरोधकांना पाणी पाजले आणि कोल्हापुरचे धनंजय महाडिक विजयी झालेत.
भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे, आणि धनंजय महाडिक विजयी झाले. तर राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल, काॅंग्रेसकडून इम्रान प्रतापगढ़ी यांनी विजयी गुलाल उधळला. शिवसेनेकडून संजय राऊतांना सलग चार वेळेस बाजी मारण्यात यश आले. मात्र संजय पवारांना अंगावर गुलाल उधळण्याची संधी यावेळी मात्र चुकली आणि त्यांचा पराभव झाला.
राज्यसभा निवडणुकीत खरी लढत ही सहाव्या जागेसाठी म्हणजे संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात होती. संजय पवारांना पहिल्या फेरीत 33 मतं मिळाली. तर धनंजय महाडिक यांना पहिल्या फेरीत एकुण 27 मतं मिळाली, मात्र दुसऱ्या फेरीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी आघाडी घेत कपाळी विजयी टिळा लावला.
दरम्यान, राज्यसभेच्या 57 जागांसाठी निवडणुक जाहीर झाली होती. यापैकी 41 जागांसाठी ही निवडणुक बिनविरोध झाली तर 16 जागांवर महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकमध्ये अटीतटीची लढत बघायला मिळाली. महाराष्ट्रात पियुष गोयल यांना 48 मत, अनिल बोंडे यांना 48, धनंजय महाडिक यांना 41 मत पडलीत. तर काॅंग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी यांना 44 मत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना 42 तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांना 43 मत पडली आहेत.