मुंबई : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन यांचा विजय झाला आहे. मात्र असे असले तरी माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे सत्ता सोडण्यास तयार नाहीत. यातच आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी थेट ट्रम्प यांना सल्ला देत आपला पराभव मान्य करावा असे म्हटले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आलेला लोकशाहीचा कौल मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारावा.अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे आणि अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्षा कमला हॅरीस यांचे हार्दिक अभिनंदन!
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) November 9, 2020
रामदास आठवले म्हणाले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आलेला लोकशाहीचा कौल मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारावा. सोबतच त्यांनी विजयासाठी नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे आणि अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्षा कमला हॅरीस यांचे देखील अभिनंदन केले.
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वात अमेरिका आणि भारत दोन्ही राष्ट्रांचे संबंध अधिक दृढ होतील. अमेरिकेच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.