एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. यावर सूनबाई रक्षा खडसे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. सासरेबुवांनी व्यक्तिगत कारणांमुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली, मात्र भाजपमध्येच राहणार असल्याचं भाजप खासदार आणि एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी सांगितलं.
“मी भारतीय जनता पक्षातच राहणार आहे. भाजपला सोडणार नाही. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मला भाजपमध्ये कुठलाही त्रास नाही” असं रक्षा खडसे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, एकनाथ खडसेंच्या सून असलेल्या रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रतिनिधित्व करत आहेत. रक्षा खडसे भाजप सोडणार नाहीत त्या भाजपमध्येच राहतील, खडसे म्हणाले
“मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली” असं एकनाथ खडसे म्हणाले. मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रक्षा खडसे भाजप सोडणार नाहीत. तो त्यांचा निर्णय आहे, असे खडसेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.