पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देण्याची फोनवरून धमकी देण्यात आली आहे. चाकणकर यांच्या पुण्यातील ऑफिसामधील फोन नंबरवर फोन करून त्यांनी ही धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धायरी येथील गारमाळ परिसरातील ब्रह्मगिरी आर्केडमध्ये रूपाली चाकणकर यांचं जनसंपर्क कार्यालय आहे. याच कार्यालयात धमकीचा फोन आल्याची माहिती रूपाली चाकणकर यांचे स्वीय सहायक राजदीप राजेंद्र कठाळे यांनी पोलिसांना दिली.
या प्रकरणी जयंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे तालुका वाळवा जिल्हा सांगली) याच्याविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. धमकी देण्यामागचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.
त्या व्यक्ती विरोधात आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.