राजस्थानमध्ये बंडाचे निशाण फडकवून आपल्याच सरकारला आव्हान देणारे सचिन पायलट यांच्याबद्दल काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आले. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आलं. त्यानंतर सचिन पायलट यांनी ट्विटरवरुन पहिली प्रतिक्रिया दिली.
“सत्याला तुम्ही व्यथित करु शकता, पराभूत करु शकत नाही” (सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं) असे ट्वीट सचिन पायलट यांनी केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष’ ही माहितीही हटवली.
दरम्यान, पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटवण्यात आलं आहे. तर त्यांच्या समर्थक आमदारांची मंत्रिपदं काढून घेण्यात आली आहेत. काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबद्दलची माहिती दिली. ‘पूर्ण बहुमतानं निवडून आलेले सरकार पाडण्यामागे भाजपाचे षडयंत्र आहे. असा आरोपही रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.