मुंबई : अलिबागचे व्यावयायिक अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी पत्रकार अर्णब गोस्वामींवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच असून या कारवाईचा आणि पत्रकारितेचा संबंध लावणे अत्यंत चुकीचे आहे. दोन वर्ष या प्रकरणात देवेंद्र फडणवीस सरकारने कारवाई न करता नाईक कुटुंबावर अन्याय केला. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत असेल तर ही कारवाई योग्यच आहे. नाईक कुटुंबाला कोणाच्या दबावाखाली धमकावून प्रकरण दाबले गेले त्या पोलीस अधिकाऱ्यावर आता कारवाई केली पाहिजे अशी मागणी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
सावंत म्हणाले, अन्वय नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी व इतर दोघांची नावे होती, असे असतानाही दोन वर्षात या प्रकरणावर फडणवीस सरकारने कोणतीच कारवाई केली नाही. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. नाईक कुटुंब हे दोन वर्षापासून न्यायासाठी संघर्ष करत आहे. परंतt त्यांना न्याय मिळाला नाही.
या प्रकरणात गोस्वामी यांचे स्टेटमेंट अलिबागला नाही तर मुंबईत एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयात नोंदवण्यात आले. एवढी स्पेशल ट्रिटमेंट कशासाठी दिली गेली. पीडित कुटुंबाला चौकशी अधिकाऱ्याने संरक्षण देण्याची अपेक्षा असताना त्या कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. पॉवरफुल लोक अर्णबच्या मागे आहेत असे सांगण्यात आले, ते लोक कोण आहेत? ते आज केंद्रीय गृहमंत्र्यांपासून इतर नेत्यांची विधाने पाहता स्पष्ट झाले आहे. याची उत्तरे तत्कालीन मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पाहिजेत.
Read Also