राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर टीका केल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. याप्रकरणावर संजय राऊत यांनी आज (13 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली
“पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रसचे प्रमुख प्रवक्ते नाहीत. त्यांचे वडील अजित पवार हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत”, अशी भूमिका शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
“शरद पवारांनी एखादी भूमिका घेतली असेल, एखादं वक्तव्य केलं असेल तर त्यावर फार चिंता करण्याचं कारण नाही. शरद पवारांना ओळखणं कठीण आहे. तरीही जे शरद पवार यांना ओळखतात त्यांनी समजून घेतलं पाहिजे, पवारांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं. त्यांचा अनुभव, त्यांची ज्येष्ठता, या देशाच्या राजकारणावरील त्यांचं स्थान पाहिल्यावर यामध्ये मीडियाने न पडलेलं बरं”, असं संजय राऊत म्हणाले.