राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्याचे नातू पार्थ पवार यांच्या मुद्द्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“शरद पवार कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत. यावरुन इतरांच्या जीवाची लगेच घालमेल होण्याचं काही कारण नाही. त्यांनी चिंता करु नये. हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, त्यांनाच पाहू द्या”, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
“खरंतर तो विषय राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षांतर्गत विषय आहे. तो शरद पवार यांच्या कुटुंबातील अत्यंत अंतर्गत विषय आहे. त्याच्यावर बाहेरच्यांनी बोलू नये. मला वाटतं पवार कुटुंब आणि त्यांचा पक्ष हे त्याविषयी चर्चा करण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी सक्षम आहेत. त्याविषयावर त्या पक्षाचे प्रवक्ते बोलतील. पवार कुटुंबातील कुणीतरी बोलतील, मी कशासाठी बोलावं?” असं संजय राऊत म्हणाले.