मुंबई : राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार या क्षेत्रांशी संबंधित 12 व्यक्तींची महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. त्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी 4 नावांची शिफारस करायची आहे. शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच, आता सिनेसृष्टीतील आणखी एका अभिनेत्रीचे विधान परिषदेसाठी नाव चर्चेत आले आहे.
मुंबई काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे यांना विधान परिषदेवर पाठवा, अशी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे मागणी केली आहे. . एक चांगले व्यक्तिमत्व, विद्वान, उत्तम भाषा शैली, निर्भीडता असलेल्या रेणुका शहाणे ह्यांची महाराष्ट्राला गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अभिनेत्री रेणुका शहाणे या विविध मुद्यांवर सडेतोड प्रतिक्रिया देण्यासाठी ओळखल्या जातात. ‘खरी तुकडे तुकडे गॅंग तुमची आयटी सेल आहे,’ असे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विट केले होते, याची आठवण जुन्नरकर यांनी करून दिली.