देशासह राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने संसर्गाचा अधिक धोका टाळण्यासाठी सरकारने सर्वच सण साजरे करण्यासाठी काही निर्बंध घातले आहेत व नियमावली दिली आहे. राज्य सरकारने बकरी ईदसाठी देखील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र आता बकरी ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नसल्याचे मत काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी व्यक्त केले आहे.
नसीम खान म्हणाले, “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम व अटींसह राज्यातील सर्व दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. भाजी मार्केट, मांस मार्केटला परवानगी आहे, मग बकरा खरेदीला परवानगी का नाही? बकरा ही ऑनलाईन खरेदी करण्याची गोष्ट नाही. सरकारमध्ये अल्पसंख्याक समाजाचे अनेक मंत्री आणि आमदार आहेत. त्यांनीही योग्य पाठपुरावा करावा.”
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी बकरी ईद साधेपणाने साजरी करावी, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. त्या अनुषंगाने शासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.