IMPIMP

“राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ पण माझ्या कष्टकरी अन्नदाता शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही” खा. शरद पवार 

 

केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज मुंबईतील आझाद मैदानात ‘संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा’ या झेंड्याखाली हजारो शेतकरी आणि श्रमिक एकत्र आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांनी या आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांना आपला पाठिंबा दिला. देशातील १२० कोटी लोकांना दोन वेळचे अन्न देणाऱ्या बळीराजाविरोधात नाकर्तेपणाची भूमिका घेणाऱ्या केंद्र सरकारचा त्यांनी यावेळी निषेध केला. शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन द्यायला जाणार होते पण राज्यपाल गोव्याला निघून गेले. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात असले राज्यपाल लाभले नाहीत. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे पण माझ्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, अशी घणाघाती टीका खा. शरद पवार साहेबांनी यावेळी केली. शेतकऱ्यांना भेटणे ही राज्यपालांची नैतिक जबाबदारी होती. राज्यातला कष्टकरी, अन्नदाता त्यांना निवेदन देण्यासाठी येणार होता त्याला सामोरं येणं अपेक्षित होतं. निदान राजभवनात तरी बसायला हवं होतं, असे मत पवार साहेबांनी मांडले.

तत्पूर्वी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अगदी धुळे-नंदुरबार इथूनही उन्हातान्हाचा विचार न करता संबंध शेतकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी मुंबईतील आझाद मैदान इथे आलेल्या शेतकरी व कष्टकऱ्यांचे पवार साहेबांनी आभार मानले.

केंद्र सरकारने कोणतीही चर्चा न करता कृषी कायदे आणले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या कायद्यावर चर्चा करण्याची मागणी केली होती. कायद्याची सखोल चर्चा करण्यासाठी स्वतंत्र सिलेक्ट कमिटी असते. या कमिटीकडे कायदे पाठवा अशी विनंती आम्ही केली. सिलेक्ट कमिटीत सगळ्या पक्षाचे लोक असतात. त्यात चर्चा होऊन एकमताने निष्कर्ष काढले जातात. पण केंद्र सरकारने चर्चा न करता, कमिटी स्थापन न करता आम्ही मांडलेला कायदा जशाच्या तसा आणावा असा आग्रह धरला. घटनेची पायमल्ली करून कायदा आणण्याचा प्रयत्न झाला. संसदीय संकेत उद्ध्वस्त करत बहुमताच्या जोरावर कायदा पास करण्याचा प्रयत्न केला गेला. पण या देशातला सर्वसामान्य माणूस हा कायदा व सरकार या दोघांनाही उद्ध्वस्त करेल, असा इशाराही पवार साहेबांनी यावेळी दिला.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री सुनील केदार, मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री नसीम खान, दादर येथील गुरुद्वाराचे प्रमुख रणधीर सिंग गिल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नेते नरसय्या आडम, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, नागरी हक्क कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, ऑल इंडिया किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, बी. जी. कोळसे पाटील, अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सचिव हनन मुल्ला, माजी आमदार विद्या चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर उपस्थित होत्या.

या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, स्वाभिमानी पक्ष, जनता दल (सेक्युलर), बहुजन समाज पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, भाकप (माले) लि., लाल निशाण पक्ष, स्वराज्य इंडिया, सत्यशोधक शेतकरी सभा, लोक संघर्ष मोर्चा तसेच इतर अनेक शेतकरी व श्रमिक संघटना सहभागी झाल्या.

Read Also

कुणाची किती लग्न न त्यांना किती पोर सांगू का ?

मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नसून काही पक्ष ढोंगबाजी करत आहेत ;फडणवीसांचा आरोप