कोल्हापूर – कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी धनंजय मुंडेंवरील बलात्काराची तक्रार मागे, मराठा आरक्षण, महाविकास आघाडी सरकार, जयंत पाटील यासारख्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची आस व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उत आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच जयंत पाटलांच्या स्वप्नाविषयी छेडलं असता, त्यांनीही लौकिकाला साजेशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. ‘उद्या मला वाटलं तर काय करु?’ असा प्रतिप्रश्न करत शरद पवारांनी पत्रकारालाच गप्प केलं.
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यास पत्रकाराने सुरुवात केली. त्यावर “मग काय झालं काय?” असा उलट प्रश्न पवारांनी विचारला. “काही संधी आहे का?” असं विचारत पत्रकाराने आपला प्रश्न पूर्ण केला. तेव्हा “उद्या मला वाटलं तर काय करु? मला कोणी करणार नाही, म्हणून मला वाटत नाही” अशी मिश्किल टिप्पणी शरद पवारांनी केली.
“मला कोणी करणार नाही, म्हणून मला वाटत नाही” या शरद पवारांच्या उत्तरावरून जयंत पाटील यांना कोणी मुख्यमंत्री करणार नाही, असा सूचक इशारा शरद पवारांनी दिला आहे.