सातारा: भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. मराठा आरक्षणाला प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असे वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.
आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळाले पाहिजे, या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी केला. वेळ आल्यावर मी मराठा आरक्षणावर जाहीरपणे बोलेन. मात्र, राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. उदयनराजे भोसले यांच्या या वक्तव्याचा रोख अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना होता.
सर्वोच्च न्यायालयात 9 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
Read also
“शरद पवारांना मराठा आरक्षण सोडून इतर सर्व गोष्टींसाठी वेळ आहे”