सोलापुर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापुर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार घोषीत करण्यात आले आहेत. या लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते निवडणुक लढवित आहेत. महायुतीकडून राम सातपुते तर महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांना आपली उमेदवारी जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर सुरूवातीला आमदार प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना पत्र पाठवलं आहे. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून राम सातपुते यांनी देखील पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना पाठवलेलं पत्र जशाच्या तसं..
मा. राम सातपुते जी,
आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणुक रिंगणात स्वागत आहे! सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते.
तसंच ह्या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळालीये त्या बद्दल शुभेच्छा देते.
लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे.
पुढील ४० दिवस याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते.
सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापूरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते.
– प्रणिती सुशीलकुमार शिंदे –
राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांना पाठवलेलं पत्र जशाच्या तसं..
आमदार प्रणिती शिंदेंजी
मी २०१९ पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय.
मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्ष राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय.
राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन.
आपला विनित राम सातपुते