पुणे : शिवसेना पक्षाकडून पुण्यातील संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. आगामी महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवली तरी शिवसेना ८० जागांवर लढेल, अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. सध्या शिवसेना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक काम करत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनमानसातील प्रतिमा दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे पुण्यातील आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संजय राऊत आज (शनिवारी) पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना किंग आणि किंगमेकर यापैकी एक नक्कीच असणार. पुण्याकडे आमचं लक्ष आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. दरम्यान, खेडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना वादावरही संजय राऊत यांनी भाष्य केले. सत्ता असली किंवा नसो आमच्यासाठी शिवसेना महत्त्वाची आहे. त्यामुळे जिथे शिवसेनेवर अन्याय होईल, तिथे आम्ही उभे राहणारच, असे संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, राजकारण हे आपलं आपण करायचं असतं. राजकारणात परमेश्वरावर विसंबून राहणाऱ्या व्यक्तीला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंना लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत राज ठाकरे यांना भविष्यात शिवसेना-मनसे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे यांनी ‘परमेश्वराला ठाऊक’, असे मोघम उत्तर दिले होते.
Read Also :
- ५ जुलैपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही
- बीडच्या मोर्च्याला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
- केंद्राने लसीकरणासंदर्भात देशाचा एक चार्ट बनवून जनतेसमोर ठेवावा – नवाब मलिक
- राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आम्ही खापर फोडले नाही; संजय राऊतांचा यु-टर्न