मुंबई: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दोनच दिवसापूर्वी भाकीत केले होते की, भाजपाने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे. फडणवीसांनाही ते मान्य असेल. दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यासाठी हा फॉर्म्युला नवीन नाही. पण जी परिस्थिती आता नव्यानं तयार होताना दिसते आहे त्याला पुन्हा महत्वं आलेलं आहे. संजय राऊत यांनी सामनामध्ये जे रोखठोक लिहिलं आहे. त्यातही त्यांनी यावर शब्द खर्च केलेले आहेत. याचाच अर्थ असा की, पुन्हा एकदा अडीच वर्षाचा मुख्यमंत्री, पाच वर्षाचा मुख्यमंत्री ह्या शब्दांना राज्याच्या राजकारणात महत्व येत आहे.
तसेच राष्ट्रवादीनं किंवा काँग्रेसनं कुठली खेळी केली तर शिवसेना पुन्हा भाजपसोबत युती करायला कचरणार नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न तर शिवसेना करत नाही ना? असा सवालही आजच्या रोखठोकनंतर निर्माण होतो.
मुख्यमंत्रीपदाबाबत काय आहे रोखठोकमध्ये?
काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदावर दावा नाही. पण राष्ट्रवादीचा तो दावा असल्याची जोरदार चर्चा ठाकरे सरकार बनलं तेव्हापासून आहे. राऊतांनी मात्र आजच्या रोखठोकमध्ये शिवसेनेचाच ‘पाच वर्ष मुख्यमंत्री’ हा शब्द असल्याची आठवण आघाडीसह सगळ्या नेत्यांना करुन दिली आहे. त्यामुळेच ह्या सरकारला अडीच वर्ष पूर्ण होताच राष्ट्रवादीचा मुख्ममंत्री होईल अशी जी चर्चा सध्या सुरु आहे त्या पार्श्वभूमीवर राऊतांच्या ‘शब्दाला’ महत्व प्राप्त होतं. हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असं जरी वारंवार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं असलं तरीसुद्धा उद्धव ठाकरेच पाच वर्ष मुख्यमंत्री असतील हे कुणीही उघडपणे सांगताना दिसत नाहीत. त्यामुळेच संभ्रम वाढतो आहे.
मग भाजपसोबत जाणार शिवसेना?
खरोखरच सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादी ‘मुख्ममंत्री’पदाची खेळी करणार का? ह्या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रवादीचे नेते तसं स्पष्ट देणार नाहीत. पण तो प्रश्न गृहीत धरुन त्याचं उत्तर आताच देण्याचा प्रयत्न राऊतांनी रोखठोकमध्ये केला आहे. राष्ट्रवादीनं खरोखरंच असा कुठला दबाव आणला तर भाजपसोबत जाण्याचा मार्ग मोकळा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न राऊतांनी रोखठोकमध्ये केला आहे. तसं नसतं तर उद्धव ठाकरे आणि मोदी यांच्यातले संबंध कसे ‘उत्तम’ आहेत हे सांगण्याचा खटाटोप त्यांनी केला असता का?