परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या राजीनामा नाट्या नंतर आता परभणीत स्थानिक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे. ज्या जिंतूर मार्केट समितीमध्ये प्रशासक मंडळाच्या नेमणुकीवरून नाराज झालेल्या शिवसेना खासदार संजय जाधव यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी त्या प्रशासकीय मंडळाच स्थगिती दिली आहे.
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस विचाराचे प्रशासक मंडळ 25 ऑगस्ट रोजी नियुक्त करण्यात आले होते. याच कारणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार संघर्ष झाल्याचे पाहावयास मिळाला. खासदार संजय जाधव यांनी 26 ऑगस्ट रोजी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला होता. त्यानंतर परभणीत राष्ट्रवादी भवनवर काहीजणांनी दगडफेक केली. तर गंगाखेडचे शिवसेना सभापती यांनी खासदारांवर राजीनाम्याचे नाटक करत असल्याचा आरोप केला. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याचे चिन्ह निर्माण झाले होते.
मागील सरकारच्या काळात जिंतूर मार्केट कमिटीवर भाजपचे प्रशासक मंडळ होते. त्यावेळी खासदार साहेबांना एखाद्या निष्ठावान शिवसैनिकांची आठवण झाली नाही. कारण स्पष्ट आहे त्यांना कार्यकर्त्यांचं नाव पुढे करून भाजपाला मदत करायची आहे राष्ट्रवादी काँग्रेसने परभणी जिल्हा परिषदेत ज्या प्रमाणे आघाडी धर्म पळाला आहे त्याच प्रमाणे खासदारांनी आघाडी धर्म पाळून विरोध करणे बंद करावे , अशी भूमी राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी घेतली आहे. तसेच आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत. त्यामुळे आगामी काळात परभणीत शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.