नाशिक – शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या संभाव्य भाजप प्रवाशाने भाजपात खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सानप यांच्या प्रवेशाआधीच भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. यामुळे सानप यांना विरोध करण्यासाठी भाजपातील एक गट जाणार वरिष्ठांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजपने बाळासाहेब सानप यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. पण आता भाजपमध्ये सानप यांच्या येण्यामुळे नाराजी असल्याचं समोर येत आहे.
खरंतर, शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशात सानप यांना पक्षात थोपवून धरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यश आल्याचंही बोललं जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी सानप यांनी चर्चा केली असून त्यांची नाराजी दूर करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे.
इतकंच नाही तर त्यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिल्याने ऐन नाशिक पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षात होणारी बंडाळी थोपविण्यात उद्धव ठाकरे यांना यश आले आहे. त्यामुळे सानप यांना पक्षात आणण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना खिळ बसल्याचंही राजकीय निरीक्षक सांगत आहेत.