पुणे: राज्यात मागील काही दिवसांपासून भोंग्यामुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भोंग्याबाबत भुमिका आणि त्याला मिळालेलं भाजपचं पाठबळ यामुळे राजकीय परिस्थिती खूप बदलली आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार हल्लोबोल केला जात आहे. यातच आज शिवसेना खासदार संजय राऊत यांची पुण्यात तोफ धडाडणार आहे. यावेळी संजय राऊत भाजप आणि मनसेवर प्रहार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेकडे आता सगळ्यांचचं लक्ष लागून राहिलं आहे.
हनुमान चालिला आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप शिवसेनेला सातत्याने डिवचण्याचा प्रयत्न करीत आहे. फक्त सत्तेसाठी लाचारी पत्करत शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. यावर शिवसेनेकडूनही भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. खासदार संजय राऊत सातत्याने पत्रकार परिषद घेत विरोधकांवर या मुद्द्यावरून निशाणा साधत आहे. सोबत मनसे देखील शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करीत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागच्या तीन सभेत हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली. औरंगाबाद येथील सभेनंतर जो काही राज्यात राडा झाला. त्यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
संजय राऊतांनीही यावर भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख संजय राऊत नवहिंदू ओवैसी म्हणून पुन्हा उल्लेख केला आहे.
दरम्यान, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात राज्यातील १५ महापालिकेच्या निवडणूका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. ओबीसी आरक्षणा शिवाय या निवडणूका घ्याव्या लागणार आहेत. यात मुंबई ठाणे पुणे नागपूर उल्हासनगर पिपंरी चिंचवड सोलापूर अकोला अमरावती नवी मुंबई औरंगाबाद वसई-विरार कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर यांचा समावेश आहे. याशिवाय २१० नगर परिषदा, १० नगर पालिका आणि १९३० ग्राम पंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे या सभेत संजय राऊत नेमकं काय बोलणार आहेत. त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.