मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि राज्यात मराठा समाजाच्या वतीने सरकार विरोधात ठिकठिकाणी निषेद व्यक्त करायला सुरुवात झाली. त्यानंतर आता सरकाने मराठा आरक्षणाबाबत वेगाने हालचाल करायला सुरुवात केली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या खंडपीठाकडे सरकारने आज मराठा आरक्षणसंबंधीची स्थगिती उठवावी यासाठी अर्ज केला. विधानसभेमध्ये देखील याबाबत आमदारांनी सकारात्मक भूमिका घेतली तर लोकसभेत देखील राज्यातील खासदारांनी हा विषय लावून धरला त्यामुळे सर्वांचीच इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
ही न्यायालयीन प्रक्रिया आहे म्हणून त्या प्रमाणेच काम करावे लागेल असे चव्हाण यावेळी म्हणाले. मराठा आरक्षणासाठीचे सकारात्मक पाऊल सरकारने उचलले आहे.तसेच आरक्षणाबाबतच्या इतर शैक्षणिक गोष्टींबाबत मुख्यमंत्री काही दिवसात आपली भूमिका मांडतील असे देखील चव्हाण यावेळी म्हणाले.
अशोक चव्हाण यांचे चंद्रकांत पाटील यांना आव्हान
ज्या नेत्यांना आरक्षण नको आहे त्यांची नावे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करावीत असे थेट आव्हान अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. तर ही वेळ एकमेकांवर आरोप करण्याची नसून मराठा आरक्षणासाठी मदतीसाठी एकत्र येण्याची असल्याचे देखील अशोक चव्हाण यावेळी म्हणाले आहेत